विश्वजीत गंडले/ घाटनांदुर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर जवळच असलेल्या किनगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. 15) घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर-किनगाव या मुख्य रस्त्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या जवळ हा अपघात झाला. MH24 BX 2787 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार आणि MH02 CH 0382 क्रमांकाची ग्रे रंगाची फोक्सवॅगन कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही कारचा वेग जास्त असल्याने धडक इतकी भीषण होती की MH24 BX 2787 या कारच्या चालक बाजूचा दरवाजा आणि साईडचा पूर्ण भाग आत घुसला असून पत्रा चक्काचूर झाला आहे. तर MH02 CH 0382 या कारच्या पुढील बोनेट, हेडलाईट आणि दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबल्या. दरम्यान, या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रस्ता अरुंद असल्याने आणि वळणावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः किनगाव ते घाटनांदूर या पट्ट्यात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.
नागरिकांची घटनास्थळी धाव
अपघाताचा आवाज ऐकताच पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तात्काळ दोन्ही कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजू शकली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची चर्चा आहे.
कारचे मोठे नुकसान
या अपघातात MH24 BX 2787 आणि MH02 CH 0382 या दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. यात जखमींची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
