अंबाजोगाई -: आयुष्याने कितीही परीक्षा घेतली तरी जिद्द, चिकाटी आणि आईच्या ममतेपुढे परिस्थितीही हतबल होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रमाबाई रणवीर. मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनवाणी पायांनी धावत त्यांनी केवळ मॅरेथॉन जिंकली नाही, तर हजारो महिलांच्या मनात आशेचा दिवा पेटवला. अशा या संघर्षमयी मातेची भेट आमदार नमिता मुंदडा यांनी घेतली. व त्यांचा मनापासून गौरव केला.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर संकुलाने आयोजित केलेल्या ‘अमृत दौड’ मॅरेथॉनमध्ये रमाबाई रणवीर उतरल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे ना महागडे स्पोर्ट्स शूज होते, ना ट्रॅक सूट. होती ती फक्त छातीत धडधडणारी जिद्द. आणि डोळ्यांत मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न. गावातील रस्त्यावर रोजच्या कष्टाने तयार झालेल्या पायांनी त्यांनी स्पर्धेत बाजी मारली आणि प्रथम क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.त्यांच्यासाठी ही रक्कम म्हणजे फक्त बक्षीस नव्हते, तर मुलींच्या वह्या-पुस्तकांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठीचा आधार होता. “माझ्या लेकी शिकाव्यात, त्यांचे आयुष्य माझ्यासारखे कष्टाचे होऊ नये,” ही एकच भावना त्यांना धावायला भाग पाडत होती. रमाबाई यांची ही कहाणी ऐकून आमदार नमिता मुंदडा भारावून गेल्या. एक आई म्हणून त्यांनी दुसऱ्या आईच्या वेदना जाणल्या. “एका आईचे दुःख दुसरी आईच जाणू शकते,” असे म्हणत त्यांनी रमाबाई यांना प्रेमाने साडी-चोळी दिली, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.फक्त सत्कार करून न थांबता, त्यांनी रमाबाई यांच्या संसाराला खरा हातभार लावला. कष्टाला बळ मिळावे म्हणून त्यांना शिलाई मशीन भेट दिली, जेणेकरून त्या स्वाभिमानाने चार पैसे कमवू शकतील. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींना नवीन ड्रेस दिले. आणि ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप केली.