विश्वजीत गंडले / घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरजवळील पट्टीवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पुढील महिन्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. यासंदर्भात रविवारी (दि. २३) गावात पूर्वतयारी बैठक उत्साहात पार पडली. शाळेच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, आजी-माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी एकवटले असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा मर्यादित असताना सुरू झालेल्या या शाळेने अनेक पिढ्यांना शिक्षणाची संधी दिली. विशेष म्हणजे आजोबा, वडील आणि नातू अशा तीन पिढ्यांनी याच शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शाळेचे गावाशी केवळ शैक्षणिक नव्हे, तर भावनिक नातेही जोडले गेले आहे.

या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील, पोलीस अधिकारी, सैनिक, शेतकरी आणि उद्योजक म्हणून विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी शतकपूर्ती सोहळ्यासाठी गावात येणार असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. शाळेची जुनी ऐतिहासिक वास्तू आजही बसस्थानक परिसरात दिमाखात उभी आहे. सध्या शाळा नवीन इमारतीत भरत असली तरी जुन्या वास्तूशी अनेकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत.

पूर्वतयारी बैठकीत शाळेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर आधारित स्मरणिका प्रकाशित करणे, आजी-माजी शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. हा सोहळा भव्य आणि अविस्मरणीय करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

तीन पिढ्यांचा शैक्षणिक वारसा

एका शाळेत तीन पिढ्यांनी शिक्षण घेणे ही त्या संस्थेच्या विश्वासार्हतेची आणि गावाशी असलेल्या घट्ट नात्याची साक्ष आहे. शाळेतून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांच्या यशातून ग्रामीण शिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित होते. शाळेचा हा शंभर वर्षांचा वारसा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

गावाच्या एकजुटीचा ऐतिहासिक सोहळा

शतकपूर्तीच्या निमित्ताने ग्रामस्थ, शिक्षक आणि माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. स्मरणिका, सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळेचा इतिहास जतन होणार आहे. परगावी स्थायिक झालेले विद्यार्थी पुन्हा गावाशी जोडले जाणे ही या सोहळ्याची महत्त्वाची बाजू आहे. त्यामुळे हा उत्सव शाळेच्या गौरवाबरोबरच सामाजिक एकोपा आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरणार आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...