पुणे:‌अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ राबवली जात आहे. कृषी विभागाकडून या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा, शेती अवजारे व इतर साधनांसाठी थेट आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

विविध घटकांसाठी मिळणारे अनुदान

  • नवीन विहीर: कमाल रु. ४,००,०००/-
  • जुनी विहीर दुरुस्ती: कमाल रु. १,००,०००/-
  • शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण: कमाल रु. २,००,०००/-
  • इनवेल बोअरिंग: कमाल रु. ४०,०००/-
  • वीज जोडणी आकार: कमाल रु. २०,०००/-
  • पंप संच (डिझेल/विद्युत – १० एचपी पर्यंत): कमाल रु. ४०,०००/-
  • सोलर पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी): कमाल रु. ५०,०००/-
  • पीव्हीसी / एचडीपीई पाईप: कमाल रु. ५०,०००/-
  • सूक्ष्म सिंचन संच:
  • ठिबक सिंचन: कमाल रु. ९७,०००/-
  • तुषार सिंचन: कमाल रु. ४५,०००/-
  • यंत्रसामग्री: कमाल रु. ५०,०००/-
  • परसबाग: कमाल रु. ५,०००/-

उपलब्ध लाभ पॅकेज (कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ अनुज्ञेय)

१. नवीन विहीर पॅकेज: नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, यंत्रसामग्री, परसबाग व इनवेल बोअरिंग (एकूण कमाल देय: रु. ६,९२,०००/-).

२. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज: जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पाईप, यंत्रसामग्री, परसबाग व बोअरिंग (एकूण कमाल देय: रु. ३,९२,०००/-).

३. शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज: अस्तरीकरण, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पाईप, यंत्रसामग्री व परसबाग (एकूण कमाल देय: रु. ४,५२,०००/-).
(टीप: शेतकऱ्याकडे आधीच विहीर असल्यास वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पाईप यांसारख्या उर्वरित आवश्यक घटकांचा स्वतंत्र लाभ घेता येईल.)
पात्रतेचे निकष

  • अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • नवीन विहिरीसाठी अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे बंधनकारक आहे. (०.४० हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास दोन किंवा अधिक शेतकरी एकत्र येऊन योजनेचा लाभ घेऊ शकतात.)
  • अर्जदाराकडे ६ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी (दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना कमाल जमिनीची अट लागू नाही).
  • ७/१२ उताऱ्यावर किंवा प्रत्यक्ष शेतात आधीपासून विहीर असू नये (नवीन विहीर घटकासाठी).
  • यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा.
    आवश्यक कागदपत्रे
  • अद्ययावत ७/१२ व ८-अ उतारा (नगरपालिका/महानगरपालिका क्षेत्राबाहेरील जमीन)
  • आधार कार्ड
  • आधार लिंक असलेले बँक खाते तपशील
  • नवीन विहिरीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील (GSDA) पाणी उपलब्धतेचा दाखला
    महत्त्वाच्या अटी व अर्ज प्रक्रिया
  • अर्ज कोठे करावा: इच्छुक शेतकऱ्यांनी www.mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • पूर्वसंमती आवश्यक: कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.
  • कामाची मुदत: नवीन विहिरीसाठी पूर्वसंमती व कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत काम सुरू करणे आवश्यक आहे. तसेच पंप संच व पाईप खरेदी पूर्वसंमतीनंतर एका महिन्यात करावी.
  • तांत्रिक निकष: शेततळे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रॉन जाडीची बीआयएस (IS:15351:2015 Type II) प्रमाणित प्लास्टिक फिल्म वापरावी. पाईप खरेदीसाठी कमाल मर्यादा रु. ५०,०००/- असून पीव्हीसी पाईपसाठी रु. ७० प्रति मीटर, एचडीपीई पाईपसाठी रु. १०० प्रति मीटर तर एचडीपीई लॅमिनेटेड पाईपसाठी रु. ४० प्रति मीटर या दराने अनुदान अनुज्ञेय आहे.