जिद्द, चिकाटी आणि सेवाव्रताचा आदर्श प्रवास – 32 वर्षांची सेवा
शब्दांकन/ रत्नाकर निकम:
श्री भास्कर शिवाजीराव सरवदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते केवळ एक शिक्षक नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण क्षेत्रात तब्बल 32 वर्षे अविरत सेवा करून आपला ठसा उमटवणारे एक प्रेरणास्थान आहे.
त्यांचे वडील कै. शिवाजीराव सरवदे हे मनमिळाऊ स्वभावाचे. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले. त्याच संस्कारातून भास्कर सरांनी शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य हाती घेतले.
शैक्षणिक आणि सेवाकार्य
जिल्हा परिषद सेवेत येण्यापूर्वी त्यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील श्री सावरकर विद्यालयात 2-3 वर्षे सेवा केली. त्यानंतर त्यांची निवड जिल्हा परिषद सेवेत झाली आणि ते प्रथम कोदरी येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले. या 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक शाळांमध्ये आपले योगदान दिले.
कोदरी शाळेत त्यांनी बराच काळ सेवा करताना तेथील गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांना केवळ शिकवलेच नाही, तर मायेने, आपुलकीने सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची मदत केली. इंग्रजी आणि गणित हे त्यांचे विशेष प्रभुत्वाचे विषय. त्यांच्या हाताखाली शिकलेली अनेक विद्यार्थी आज समाजात चांगल्या व उच्च पदावर कार्यरत आहेत, हीच त्यांच्या 32 वर्षाच्या कार्याची खरी पावती आहे.
त्यानंतर भास्कर सर जिल्हा परिषद शाळा केकतसारणी येथे बदलून गेले. तेथे ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सध्या ते जि.प. प्राथमिक शाळा, होळ वस्ती – होळ येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शिस्तीचे दुसरे नाव म्हणजे भास्कर
सर. या 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी कधीही शाळेला उशीर केला नाही.
पर्यावरण प्रेम आणि सामाजिक बांधिलकी
आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा शेवटचा दिवस त्यांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला – 50 देशी झाडे लावून.
सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ताभाऊ बारगजे यांच्या भेटीनंतर ते त्यांच्या कार्याने प्रेरित झाले आणि समाजातील उपेक्षित, वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला.
निवृत्तीनंतर कोणतेही बंधन नसताना सुद्धा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नयेत या तळमळीतून त्यांनी डबघाईस आलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज येथे स्वयंसेवी वृत्तीने कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा या 32 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरूवर्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
