डी. सदानंद/अंबाजोगाई: शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. बीएनसी ऑफिसच्या शेजारी असलेल्या शिकलकरी वस्तीतील कुटुंबांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या १९८४ पासून म्हणजेच जवळपास चार दशकांपासून येथे ही कुटुंबे वास्तव्यास आहेत.

या वस्तीत लहान मुले, वयस्कर महिला आणि दोन अंध महिलांसह अनेक कुटुंबे पत्र्यांचे आडोसे उभारून राहत होती. अतिक्रमण मोहिमेत हे आडोसे हटविण्यात आल्याने घरातील भांडीकुंडी, कपडे, अंथरुण-पांघरुण रस्त्यावर आले आहे. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.या ठिकाणी भेट दिली असता परिस्थिती मन हेलावणारी होती. जेसीबी दिसला की मुले घाबरतात आणि ‘दादा, थांबा’ अशी आर्त हाक देतात. हा प्रसंग उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेला. कोरोना काळात याच वस्तीतील कुटुंबांना अंबाजोगाईकरांनी मदत केली होती. आता पुन्हा एकदा सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनी पुढे येऊन या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी मदत करण्याची गरज आहे.

तिरंग्याचा अभिमान

मात्र या उद्ध्वस्त संसारातही एक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आजूबाजूला घराच्या भिंती नाहीत, डोक्यावर छप्पर नाही, सगळा संसार अस्ताव्यस्त पडलेला असताना एका मोडक्या फ्रीजवर दोन तिरंगे अभिमानाने फडकत होते. घर उद्ध्वस्त झाले तरी देशावरील प्रेम आणि तिरंग्याचा अभिमान कायम असल्याचे हे दृश्य सांगत होते.सध्या त्या ठिकाणी नालीचे बांधकाम सुरू असून परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. रस्ते मोकळे होणे गरजेचे असले तरी विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचाही विचार होणे गरजेचे आहे.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...