धम्माचे पालन करणारा व्यक्ती बलवान बनतो – पू. भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो
अंबाजोगाई (प्रतिनिधी): भगवान बुद्धांनी दिलेला धम्म टिकवून ठेवण्यासाठी भिक्खू संघाचे ऐक्य, शिस्त आणि सामूहिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भिक्खू संघाच्या त्यागामुळेच धम्म व बौद्ध संस्कृती आजही टिकून आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले.
पूज्य भदंत धम्मशील थेरो यांच्या १४ व्या कठीण चीवरदान दानोत्सव समारंभानिमित्त रविवारी अंबाजोगाई येथील अनिकेत मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पूज्य भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले, भगवान बुद्धांनी स्थापन केलेला भिक्खू संघ हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून धम्माचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. कठीण चीवरदान हा केवळ वस्त्रदानाचा विधी नसून त्यामागे दान, त्याग, श्रद्धा आणि भिक्खू संघाप्रती कृतज्ञतेची भावना आहे.
धम्माचे पालन करणारा बलवान बनतो – खेमधम्मो महाथेरो
कार्यक्रमाचे अध्यक्ष पू. भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो म्हणाले, जगामध्ये दुःख आहे आणि या दुःखातून बुद्ध धम्मच जगाला बाहेर काढू शकतो. धम्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला धम्म बलवान बनवतो. माणसाने अमर्याद दानी, उत्साही, मैत्रीवान व करुणावान व्हावे.
धम्म आचरणाने माणूस नितीमान बनतो – धम्मशील थेरो
पूज्य भिक्खू धम्मशील थेरो म्हणाले, धम्म आचरणाने माणूस सदाचारी, गुणवान, नितीमान बनतो. श्रद्धा, शील, करुणा आणि प्रज्ञा या गोष्टी आचरणात आणा. दु:ख मुक्त होण्यासाठी धम्माचे आचरण करावे लागेल.
यावेळी जयभिम नगर पंचशील बौद्ध विहार येथे सकाळी धम्म ध्वजारोहण झाल्यानंतर सवाद्य धम्म मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला हजारो उपासक-उपासिकांनी श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले, प्रस्ताविक अनिता शिंदे यांनी मांडले तर आभार सतीश बनसोडे यांनी मानले.
