विश्वजीत गंडले/घाटनांदुर: महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये गोदावरी पब्लिक स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक तथा घाटनांदुर गावचे सुपूत्र विजय रानभरे यांचा गौरव करण्यात आला आहे.दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विजय रानभरे हे मागील 20 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
ज्ञानरचनावाद आणि NEP वर व्याख्याते
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातून त्यांनी ज्ञानरचनावाद, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), नवनवीन अध्यापन पद्धती यावर प्रभावी व्याख्याने दिली आहेत. हिंदी विषय परिषदांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.आकाशवाणीच्या ‘मानव आणि पर्यावरण’ तसेच ‘युवावाणी’ कार्यक्रमातून त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयांवर विचार मांडले आहेत.
‘नशीब’ लघुचित्रपटाला पुरस्कार
विजय रानभरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नशीब’ या लघुचित्रपटास दैनिक लोकमतच्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.यापूर्वी दिल्लीतील मानव विकास फाउंडेशनच्यावतीने त्यांना ‘इनोव्हेटिव्ह टीचर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.या यशाबद्दल औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार तथा संस्थेचे सचिव मा. विक्रम काळे, प्राचार्य शुभांगी सूर्यवंशी, मुख्याध्यापक नितीन कवडे आणि विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
