ङि सदानंद/ अंबाजोगाई:- सध्या बीड जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला असताना. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला अंबा सहकारी साखर कारखाना अद्यापही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि चर्चेला उधाण आले आहे. शेजारील कारखाने सुरू झाल्याने परिसरातील ऊस संपत चालला असून, मग आंबा कारखाना नक्की कोणाचा ऊस गाळणार, असा थेट सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

अंबाजोगाई परिसरातील ऊस पट्ट्यात यंदा चित्र काहीसे वेगळे आहे. येथील प्रमुख तीन खाजगी कारखाने – नॅचरल सुगर (रांजणी), येडेश्वरी शुगर (येडेश्वरीनगर) आणि गंगा माऊली शुगर (केज) यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्याच आठवड्यात आपल्या बॉयलरचा अग्नी प्रदीप्त करून गाळपाला सुरुवात केली आहे. या कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ॲडव्हान्स आणि तोडणी टोळ्या दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा ओढा साहजिकच तिकडे वाढला आहे. दुसरीकडे यंदा निसर्गानेही शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. संपूर्ण केज, अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, बोरवेल कोरड्या पडल्याने अनेक ठिकाणी ऊसाचे क्षेत्र जळून गेले आहे. ज्या ठिकाणी ऊस जगला आहे, तिथेही वाढ खुंटली असून टनेजमध्ये मोठी घट आली आहे. गेल्या वर्षी जिथे एकरी ४० टन ऊस निघत होता, तिथे यंदा २० ते २५ टनावरच उत्पादन आले आहे. त्यामुळे एकूणच ऊसाची उपलब्धता निम्म्याहून कमी झाली आहे.

ऊस कमी आणि कारखाने जास्त

अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. हातात आलेला ऊस वाळून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आहे तो ऊस नॅचरल, येडेश्वरी आणि गंगा माऊली तसेच बाहेरील जिल्हातील कारखान्यांना देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रोज शेकडो ट्रॅक्टर-ट्रॉली ऊस घेऊन या कारखान्यांकडे जाताना दिसत आहेत. यामुळे गाळपाला ऊस शिल्लक राहणार नाही. अशा परीस्थीतीत अंबा साखर कारखाना कसा सुरु होणार अशी शेतकऱ्यांमध्ये आहे.

आम्ही अंबा कारखान्याची वाट पाहत बसलो तर आमचा ऊस शेतातच वाळून जाईल. पाणी नाही, त्यामुळे कारखाना सुरू होईपर्यंत ऊसाची प्रत खराब होईल. म्हणून नाईलाजाने दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यावा लागत आहे, अशी व्यथा देवळा, पाटोदा, आपेगाव, बनसारोळा, युसूफवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

कारखाना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या तांत्रिक दुरुस्ती आणि बॉयलर मेंटेनन्सची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच कारखाना सुरू होईल, असे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात परिसरातील ७० ते ८० टक्के ऊसाची तोडणी होऊन गेल्यानंतर कारखाना सुरू होऊन काय उपयोग, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...