गौतम बचुटे/केज;- केज तालुक्यातील साळेगाव जवळ मध्यरात्री भीषण तिहेरी अपघात झाला आहे. ट्रॅक्टर आणि दोन कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले असून, तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना सोमवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. बीड तालुक्यातील पहाडी पारगाव येथील ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून कळंबच्या दिशेने साखर कारखान्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या फोर्ड कंपनीच्या कारने (क्रमांक MH 23 AS 2333) ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने थेट ट्रॅक्टरच्या पुढील भागाला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर काळ्या रंगाची कार रस्त्यावरच आडवी झाली. त्याचवेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगन-आर कारने (क्रमांक MH 44 Z 5684) रस्त्यावर आडव्या पडलेल्या कारला आणि ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामुळे हा तिहेरी अपघात घडला.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तात्काळ आपल्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण आणि पोलीस कर्मचारी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास केज पोलीस करत आहे.
