तानाजी माटे/ लातूर:
लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा पाटीजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अपघातानंतर वाद घालून मेंढपाळाला मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ आपल्या कळपासह महाळंग्रा पाटी परिसरातून रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान लातूरच्या दिशेने येणाऱ्या एका स्विफ्ट कारने (क्रमांक MH-02-CH-4733) रस्त्यावरील मेंढ्यांच्या कळपाला थेट धडक दिली. या धडकेत दोन मेंढ्या जागीच दगावल्या, तर १२ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यातील सात मेंढ्यांचे पाय मोडले आहेत.

अपघातानंतर मारहाण; तक्रार घेण्यास टाळाटाळ?

अपघाताची भीषणता एवढी होती की मेंढपाळांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, मदत करण्याऐवजी कारचालकाकडून शिवाजी पंढरी म्हेत्रे यांना जबर मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत मेंढपाळ शाम मारोती माकणे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून अद्याप योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

मेंढपाळांच्या सुरक्षेचा आणि नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर

पशुधन हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या या गरीब मेंढपाळांवर या अपघातामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेचा तातडीने पंचनामा करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, मारहाण करणाऱ्यांचा शोध घ्यावा आणि नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. चाकूर पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कधी गुन्हा दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...