अंबाजोगाई/प्रतिनिधी: चनई-आडस रोडवर पवनचक्की प्लँटचे काम सध्या अतिशय वेगात आणि प्रगतीपथावर सुरू आहे. या ठिकाणी पवनचक्की उभारणीसाठी लागणारे साहित्य, महाकाय यंत्रसामुग्री आणि अवजड वाहने दाखल झाली असून काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रोडवर उभारला जात असलेला हा मुख्य प्लँट असून, या प्लँटचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पवनचक्क्या शेतात उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत भावठाणा, धावडी, केंद्रेवाडी, डोंगरपिंपळा व या परिसरातील गावांतील शेतामध्ये पवनचक्क्या उभारण्यात येणार आहेत. यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेताची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.या प्रकल्पाची सर्वात महत्वाची आणि विश्वासार्ह बाब म्हणजे, संबंधित कंपनीने या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना ॲडव्हान्स रक्कम देखील दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ प्रस्तावित नसून प्रत्यक्षात अंमलात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ॲडव्हान्स रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

परिसराच्या विकासाला मिळणार चालना

पवनऊर्जा हा अपारंपरिक, हरित आणि शाश्वत ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच विजेच्या वाढत्या गरजेला पर्याय उपलब्ध होणार आहे.त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पवनचक्क्या उभ्या राहणार आहेत, त्यांना कंपनीकडून दरवर्षी भाड्याच्या स्वरूपात कायमस्वरूपी आणि निश्चित उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे शेतीसोबतच शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.आडस-चनई रोडवरील प्लँटचे काम पूर्ण होताच भावठाणा, धावडी, केंद्रेवाडी, डोंगरपिंपळा परिसरातील शेतांमध्ये लवकरच पवनचक्क्या उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...