अंबाजोगाई/प्रतिनिधी: येडेश्वरी साखर कारखाना लि., युनिट-१ आनंदगाव (सा), ता. केज, जि. बीड यांच्यामार्फत शेअर्सधारक शेतकऱ्यांना दिवाळी सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने येडेश्वरी कारखान्याच्या वतीने शेअर्सधारक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात येत आहे. शेअर्सधारकांची संपूर्ण यादी कारखान्याकडे उपलब्ध असून, शेतकऱ्यांना साखर घेण्यासाठी फक्त आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तेथे संपर्क साधावा.शेअर्सधारक शेतकऱ्यांनी ५ नोव्हेंबरपर्यंत ही मोफत साखर घेऊन जावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्यात सोय

शेअर्स धारक शेतकऱ्यांना साखर त्वरित मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यातील कार्यालयात ही साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील शेअर्सधारक शेतकऱ्यांसाठी ही साखर आंबा साखर कारखाना येथे असलेल्या कार्यालयातून मिळत आहे.

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

येडेश्वरी साखर कारखाना लि., युनिट-1 आनंदगाव (सा), ता. केज, जि. बीड येथील सर्व कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून कारखाना प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बोनस सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.कारखान्याच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या कामाची दखल घेऊन आणि दिवाळी सण गोड व्हावा या उद्देशाने हा बोनस देण्यात आला आहे.कारखान्याचे कार्यकारी संचालक सौरभ बजरंग सोनवणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून, यापुढेही कारखाना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहील, असे सांगितले.कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...