अंबाजोगाई (प्रतिनिधी) :– अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलू-अंबा मार्गावर भरधाव ट्रकने स्विफ्ट डिझायर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून चालक जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १:२० वाजेच्या सुमारास सेलू-अंबा गावच्या शिवारात घडली. फिर्यादी रमेशवर बाबुराव जाधव (वय ३६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मुरंबी, ह.मु. रेणुका वसाहत, अंबाजोगाई, जि. बीड) हे आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH 14 AJ 1558) ने अंबाजोगाईकडे येत होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक (क्र. MH 40 BG 0683) च्या चालकाने आपले वाहन हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोळवे हे करीत आहेत
गाडीचे चार लाखांचे नुकसान
धडक इतकी भीषण होती की कारच्या पाठीमागील डिक्कीचा संपूर्ण भाग आतमध्ये दबला गेला असून मागील काच पूर्णपणे फुटली आहे. या अपघातात कारचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच फिर्यादी रमेशवर जाधव यांच्या डोक्याच्या मागील बाजूस व उजव्या पायाच्या घोट्याजवळ मार लागून ते जखमी झाले आहेत.
रस्त्यावर खड्डे
मार्गावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी अडचण येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. टोलनाक्याचा टोल नागरिक भरतात परंतु रस्त्या व्यवस्थित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहन सांभाळणे कठीण होत आहे.
