;
अंबाजोगाई (प्रतिनिधी): लाईनचे पाणी व्यवस्थित येत नसल्याच्या कारणावरून पोखरी (ता. अंबाजोगाई) येथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला कॉलर पकडून बेदम मारहाण करण्यात आली असून, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईवरही हात उचलण्यात आला आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि दमदाटी केल्याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोखरी येथील निमशासकीय पाणीपुरवठा कर्मचारी विनोद रामभाऊ बळवंत (वय ३८) हे दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गावात पाणी सोडून छत्रपती शिवाजी चौकातून घरी जात होते. त्यावेळी आरोपी ऋषीकेश हरीशचंद्र निकम याने ‘तू सोडलेले पाणी लाईनमध्ये येत नाही’ असे म्हणत शिवीगाळ करून कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी फोन लावत असताना आरोपीने त्यांच्या हातातील Redmi कंपनीचा मोबाईल हिसकावून दगडावर आपटून फोडला. एवढ्यावरच न थांबता, पाणीपुरवठ्याचे सर्व व्हॉल्व्ह (Wall) सबलने फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता, दुसरा आरोपी विश्वजीत ऋषीकेश निकम याने तिलाही मारहाण केली. तसेच आरोपीने ग्रामपंचायत सरपंच व अधिकाऱ्यांनाही फोनवरून शिवीगाळ करत “उद्या गावात आल्यास बघतोच” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विनोद बळवंत यांच्या फिर्यादीवरून आरोपी ऋषीकेश हरीशचंद्र निकम आणि विश्वजीत ऋषीकेश निकम (दोघे रा. पोखरी) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रेड पो. उपनिरीक्षक शेप करत आहेत.
