अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहराला रेल्वेने जोडण्याच्या मागणीने आता वेग घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून अंबाजोगाईकर ज्या रेल्वेची वाट पाहत आहेत, त्या प्रश्नाला आता अधिकृत व्यासपीठ मिळणार आहे.मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदित्य पतकराव हे येत्या २६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत अंबाजोगाईसाठी नवीन रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मांडणार आहेत. ही बैठक पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.

डॉ. पतकराव यांच्या माहितीनुसार, ते रेल्वे प्रशासनासमोर दोन पर्याय ठेवणार आहेत. पहिला पर्याय म्हणजे २०१६ साली मंजूर झालेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे मार्गाचा प्रलंबित सर्व्हे पुन्हा सुरू करण्यात यावा. आणि जर हा मार्ग तांत्रिक कारणामुळे शक्य नसेल, तर अंबाजोगाई शहराला जोडणारा दुसरा कोणताही पर्यायी मार्ग शोधून नवे स्टेशन मंजूर करावे.

दिल्लीपर्यंत केला पाठपुरावा

हा विषय केवळ पुणे विभागापुरता मर्यादित नसून, यासाठी दिल्ली स्तरावरही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. पतकराव यांनी यापूर्वीच दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन अंबाजोगाईच्या रेल्वे मागणीचे निवेदन दिले आहे.बीड जिल्ह्यात नुकतेच बीड रेल्वे स्टेशन सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच स्थानके पुणे रेल्वे विभागात येत असल्याने, आता अंबाजोगाईलाही त्याचा फायदा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अंबाजोगाई हे शैक्षणिक, वैद्यकीय आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे शहर आहे. येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, योगेश्वरी मंदिरामुळे हजारो नागरिकांची ये-जा असते. रेल्वे आल्यास व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

अंबाजोगाईला रेल्वे मिळणे ही गरज आहे. मी यापूर्वीच केंद्रीय मंत्र्यांकडे हा विषय मांडला आहे. आता २६ तारखेच्या बैठकीत अधिकृतपणे प्रस्ताव मांडून त्याचा पाठपुरावा करणार आहे,” असे डॉ. आदित्य पतकराव यांनी सांगितले.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...