अंबाजोगाई (बीएन वृत्तसेवा):
अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून गावी आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. यातील बहुतांश जणांकडे सीएनजी कार आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाकी परिसरातील एकमेव सीएनजी पंपावर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त आणि जास्त मायलेज देणारा आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत शहरात सीएनजी वाहनांची संख्या वेगाने वाढली. मात्र, त्या तुलनेत सीएनजी पंपांची संख्या वाढलेली नाही. परिणामी, दररोज पहाटे सहा वाजल्यापासूनच पंपावर मोठी गर्दी होत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकदा ‘सीएनजी संपला आहे’ असा फलक पाहण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे.
मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकांनाही अडथळा
पंपावर वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे सीएनजीसाठी आलेली वाहने मुख्य रस्त्यावर अर्ध्या किलोमीटरपर्यंत उभी राहत आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या कोंडीतून मार्ग काढताना शाळकरी मुले आणि नोकरदारांची मोठी दमछाक होत आहे. विशेष म्हणजे, आपत्कालीन रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसत असून रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

रिक्षाचालकांच्या रोजगारावर संक्रांत

सीएनजी तुटवड्याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना बसत आहे. दररोज ४ ते ५ तास रांगेतच जात असल्याने त्यांचा अर्धा दिवस वाया जात आहे. दिवसभरात केवळ दोन ते तीनच फेऱ्या होत असल्याने रिक्षाचालकांचे रोजचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. दुसरीकडे, वेळेवर रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत.

नवीन सीएनजी पंपाची मागणी

पाण्याच्या टाकी परिसरातील पंप हा शहरातील एकमेव मोठा पंप आहे. वाढती वाहनसंख्या लक्षात घेता प्रशासनाने आणि गॅस कंपनीने तातडीने लक्ष घालून सीएनजी पुरवठा सुरळीत करावा, तसेच शहराच्या आणि तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि सीएनजी असणाऱ्या गाड्या लक्षात घेऊन दुसरा सीएनजी पंप सुरू करावा, अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...