अंबाजोगाई (प्रतिनिधी): शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे, ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, या दृष्टीने दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्राचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. बीड जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र वेगाने प्रगती करत असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे करीत आहे, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड, वेस्टर्न कोलफील्डस लिमिटेड, डॉ. भाभा राज्य तंत्रज्ञान विद्यापीठ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित कृषी ड्रोन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान, बीड प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, डॉ. ब्रिजेश अय्यर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. गोपाळ शिंदे उपस्थित होते.
खासदार डॉ. गोपछडे म्हणाले की, कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या कामात सुलभता निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यासाठी काटेविरहित निवडुंग लागवड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे आवाहन त्यांनी केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या दिवाळी भेट किटच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. वसंत देशमुख यांनी कृषी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, शेतकऱ्यांना ड्रोन सेवा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी आगामी काळात १० कृषी ड्रोनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी दिवाळी भेट किट व इतर उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्री उपक्रमात सहभागी असलेल्या दीपाली बेंद्रे (युसुफवडगाव), गोदावरी राऊत (सादोळा), धनश्री गीते (नंदागोळ) आणि सुनीता डावकर (बीड) या महिला उद्योजिकांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात डॉ. गोपाळ शिंदे आणि डॉ. विशाल काळबांडे यांनी कृषी ड्रोन तंत्रज्ञानाचे कार्य, शेतीतील विविध उपयोग, ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्र आणि या क्षेत्रातील उपलब्ध संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ प्रमोद रेनापुरकर यांनी केले.
