अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई तालुक्यातील धावडी गावावर सध्या भीषण पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. गावातील सर्व छोट्या-मोठ्या विहिरींनी अक्षरशः तळ गाठला असून, गावाची ओळख असलेला आणि गेल्या शंभर वर्षांपासून कधीही न आटलेला ऐतिहासिक लांडगदरा तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.

यंदा मान्सूनने पाठ फिरवल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या फोटोत विहिरीचा तळ स्पष्टपणे दिसत असून, पाण्यात दगड दिसू लागले आहेत. पाण्याअभावी गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिके वाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.गावातील जेष्ठ नागरिकांच्या सांगण्यानुसार, लांडगदरा तलाव हा फार जुना आहे. गेल्या शंभर वर्षात मोठा दुष्काळ पडला तरी हा तलाव कधीही कोरडा पडला नव्हता.

परंतु यंदा पहिल्यांदाच हा तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून, त्याच्या तळाला भेगा पडल्या आहेत.सध्या गावात पाण्याचा प्रचंड ठणठणाट असून, गावाची तहान केवळ टँकरवरच भागवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी ते अपुरे पडत आहे. महिलांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे.प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन गावासाठी कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, टँकरची संख्या वाढवावी आणि धावडी गावाला टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...