गेवराई:बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने शहरातील पवार गल्ली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खडके हे आपल्या पत्नी आणि मुलीसह रिक्षाने घरी जात होते. पवार गल्ली परिसरातील मशिदीजवळ काही तरुण फटाके फोडत होते. त्याचवेळी फटाक्याची एक ठिणगी खडके यांच्या मुलीच्या अंगावर पडली. याच कारणावरून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
धारदार शस्त्रांनी सपासप वार
जमावाने एकत्र येत खडके कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात अंगावर, मानेवर आणि पाठीवर सपासप वार करण्यात आले. या मारहाणीत एका महिलेलाही मारहाण करण्यात आली असून, एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धराज सुकाळे आणि जमादार सोनवणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी तात्काळ जखमींचे जबाब नोंदवून घेतले असून, या प्रकरणी सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

