गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथे गेली बारा वर्षे एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. अनाथ, विधवा, परितक्त्या आणि दिव्यांग बांधवांसाठी ‘अनाथांची दिवाळी’ हा कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
समाजातील दानशूर व्यक्ती आणि पत्रकारांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम गेली 12 वर्षे अविरत सुरू आहे. पत्रकार गौतम बबुटे, जय जोगदंड आणि अक्षय वरपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी किराणा साहित्य आणि फराळाचे किट वाटप केले जाते.
पोलिस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
दि. 11 नोव्हेंबर रोजी ‘घासातील एक घास अनाथांसाठी’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल सूर्यतळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सुंदराबाई सूर्यतळ, युसुफवडगावचे सहाय्यक निरीक्षक संदीप मांजरमे, ज्येष्ठ समाजसेवक प्रा. हनुमंत भोसले उपस्थित होते.तसेच रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, पत्रकार विजयराज आरकडे, प्रा. डॉ. हनुमंत सौदागर, जीएसटी अधिकारी रामचंद्र इंगळे आणि सरपंच कैलास जाधव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सरपंच कैलास जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गरजूंना फराळ किटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी
“यावेळी बोलताना आयोजक म्हणाले, “गेली 12 वर्ष हा उपक्रम अविरत सुरू आहे. गावातील दानशूर आणि नोकरदार वर्ग मोठी मदत करतात. हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.”
उपस्थितांचे डोळे पाणावले
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी आई-वडिलांच्या सेवेबद्दल आपले अनुभव सांगितले. त्यांचे अनुभव ऐकून उपस्थित माता-भगिनींच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दुष्काळावर चर्चा
यावेळी प्रा. हनुमंत भोसले आणि प्रा. डॉ. हनुमंत सौदागर यांनी दुष्काळावर मार्गदर्शन केले. दुष्काळ हे संकट नसून संधी आहे, जलसंधारण करून पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश त्यांनी दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम बबुटे, जय जोगदंड, अजय बबुटे, महादेव माने, बलभीम बबुटे आणि यश बबुटे यांनी परिश्रम घेतले.
