⚠️ कॉपीराईट सूचना

बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)

विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अहमदपूर ते अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ड वर अपघाताची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. घाटनांदूर पासून जवळ असलेल्या वाकडी फाट्यावर शनिवारी(दि. १४) पुन्हा एक भीषण अपघात घडला. या अपघातात एक महिला गंभीर तर दोन मुले आणि तीन पुरुष जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गाडी क्रमांक एमएच 12 डी 9442 ही कार अहमदपूरहून अंबाजोगाईच्या दिशेने येत होती. वाकडी फाट्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इंजिन, बॉनेट आणि चाकाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले दिसत आहेत. फोटोत दिसत असल्याप्रमाणे गाडी उलट्या अवस्थेत झाडीत पडली आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

548 ड महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

अहमदपूर-अंबाजोगाई महामार्ग क्रमांक 548 ड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी असलेले खड्डे, वळणावर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वेगावर नियंत्रण नसणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. मागील काही महिन्यांत या पट्ट्यात अनेक जीव गेले आहेत, तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

अपघातांची मालिका कायम

घाटनांदूर ते वाकडी फाटा हा भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. यापूर्वीही याच ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाने तातडीने या ठिकाणी गतिरोधक, सूचना फलक आणि रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

अपघातातील जखमींना तातडीने मिळाली मदत

अपघाताची माहिती मिळताच पो.कॉ. बलिराम मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. तर स्थानिक नागरिक यशवंत डापकर, सुग्रीव नागरगोजे, गोविंद चाटे आणि लक्ष्मण नागरगोजे यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे जखमींना वेळेत दवाखान्यात हलवणे शक्य झाले आणि पुढील उपचार सुरू करता आले.
सध्या अनेक ठिकाणी अपघातानंतर मदत करण्यास टाळाटाळ केली जाते, मात्र या नागरिकांनी जबाबदारीचे भान राखत मदत केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...