विश्वजीत गंडले / घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर (जि. बीड) येथील कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील ठराविक मर्जीतल्या शेतकऱ्यांनाच वारंवार शासकीय कृषी योजनांचा लाभ दिला जात असून, इतर पात्र शेतकऱ्यांना माहिती आणि लाभापासून वंचित ठेवले जात असल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे.
या संदर्भात परमेश्वर मुंजा वैद्य, रा. घाटनांदूर यांनी दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या कृषी योजनांचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना समान आणि पारदर्शक पद्धतीने मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या पक्षपात होत आहे. मागील तीन वर्षात कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला, याची यादी तपासून अहवाल द्यावा आणि लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित कृषी सहाय्यक अधिकाऱ्यावर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी, अन्यथा वरिष्ठ कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
शासनाच्या निवडीच्या सूचना काय आहेत?
शासनाच्या प्रमाणित बियाणे वाटप योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लाभार्थी निवड ही महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या लक्षांकाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने निवड करून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.
या प्रकरणी घाटनांदूरच्या सहाय्यक कृषी अधिकारी मुंडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी सांगितले की,”कोणत्याही कृषी योजनेत वैयक्तिक पसंतीला वाव नाही. सर्व निवड प्रक्रिया ही ऑनलाइन अर्ज, आधार पडताळणी आणि लॉटरी पद्धतीने पारदर्शकपणे केली जाते. तसेच ज्या शेतकऱ्याला एकदा लाभ मिळाला आहे, तो शासन नियमानुसार किमान २ वर्षांसाठी पुन्हा पात्र राहत नाही. सर्व प्रक्रीया पारर्दशकपणे पार पाडण्यात आली आहे.
