गौतम बचुटे/केज :- केज जवळ असलेल्या बरड फाटा येथील रेणुका कला केंद्रावर एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने डांबून ठेवून तिला ग्राहका समोर नाचायला लावून अनैतिक धंद्यासाठी बळजबरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून कला केंद्राचा मालक, संगीत पार्टीची मालकीण आणि अन्य एका विरुद्ध पोक्सोसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी ता. ब्रम्हपुरी येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या एका ओळखीच्या प्रगती चाहंदे (रा. चांदली ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) येथील महिलेने तिला लातूर येथे नोकरीचे आमिष दाखवून दि. ३० जुलै २०२६ रोजी अडीच हजार रु. पाठविले. त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी लातूर येथे गेल्यावर तिला प्रगती चाहंदे हिने लातूर जिल्ह्यातील शिंदाडा येथील राधिका कला केंद्रात नेले, परंतु वय कमी असल्याने काम देता येणार नाही असे सांगितले.

त्यानंतर प्रगती चाहांदे हिने त्या मुलीला त्या कला केंद्रातील पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण (रा.चापडोहा, ता. जि. यवतमाळ) हिच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रूमवर पाठवून एका एमएससीआयटी केंद्रात तिचे वय बदलून बनावट आधार कार्ड तयार केले.

त्यानंतर दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार्टी मालकीण अंजली चव्हाण हिने त्या अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील बरड फाटा जवळील रेणुका कला केंद्रात घेऊन गेली. या कला केंद्राचे मालक सुजित शिनगारे (रा. अंबाजोगाई) व पार्टी मालक अंजली भारत चव्हाण यांनी अल्पवयीन मुलीचे वय कमी असल्याचे माहित असताना बनावट आधारकार्ड तयार करून तिला बळजबरीने नाचकाम करायला लावले. तेथे येणाऱ्या ग्राहकांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केले आणि पार्टी मालकीण अंजली हिने तिला ग्राहकांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. नकार देताच तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि बळजबरीने स्वयंपाक व धुणी भांडी करायला लावले.

पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात !

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण हिला ताब्यात घेतले असून दोघांच्या मागावर पोलिस आहेत.

गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादी वरून अंजली भारत चव्हाण (रा. चापडोह, ता. जि. यवतमाळ), रेणुका कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे (रा. सारुळ ता. केज) आणि त्याचा साथीदार सुजित शिनगारे (रा. अंबाजोगाई जि. बीड) या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ७१५/२०२६ भा. न्या. सं. ७५, ७९, १४३(४), १४६, ३३७, ४४० यासह पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके तपास करीत आहेत.

आणखी आरोपींची संख्या वाढू शकते

अल्पवयीन मुलीला फसवून तिच्याकडून अनैतिक संबंधासाठी डांबून ठेवणे आणि छळ केल्याप्रकरणी आणि तिचे बनावट आधार कार्ड तयार करून देणारे तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करणारे ग्राहक यांचा तपास घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...