अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास अंबाजोगाईत खोतेश्वर माध्यमिक विद्यालयात दिमाखात सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण १३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणार असून यामध्ये एकूण १९७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
शिक्षकांच्या व्यावसायिक जीवनात वरिष्ठ आणि निवड श्रेणीला अत्यंत महत्व आहे. केवळ १२ वर्षे आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर श्रेणी मिळत नाही, तर त्यासाठी हे प्रशिक्षण पूर्ण करणे आणि त्यातील मूल्यमापनात पात्र होणे अनिवार्य असते. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत नावीन्य येते, नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020), डिजिटल शिक्षण, आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल मार्गदर्शन मिळते. त्यामुळे या प्रशिक्षणाचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. सर्व प्रशिक्षणार्थींना १००% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
दिमाखात उद्घाटन सोहळा
दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रशिक्षणाचे उद्घाटन डायटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी आणि प्रशिक्षण समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रशिक्षणाचे स्वरूप आणि शिस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यांचे मार्गदर्शन
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (बीट-कारखाना, आपेगाव) अशोक कोपले, प्रशिक्षण समन्वयक सुरेश सलगर (केंद्रप्रमुख बर्दापूर), संपर्क अधिकारी सुलक्षणा पवार हे काम पाहत आहेत.तर सुलभक म्हणून श्रीनिवास मोरे, अनंत सुर्यवंशी, वैजनाथ शेंगुळे, अनंत जोशी, दिलीप नरवडे, सुनिल वाघमोर, शेख आबेद, रामलिंग बेले, रमेश भोसले हे परिश्रम घेत आहेत.
