आदर्श शिक्षक व प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा

अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: आपेगाव येथे कै. शेषरावजी (आप्पा) शिंदे स्मृती समारोहाचे 15 वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आपेगाव येथे आदर्श शिक्षक व प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

गेली 15 वर्षे हा समारोह केवळ आठवण म्हणून साजरा होत नाही, तर शिक्षण आणि शेती या दोन क्षेत्रांत प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय. कै. शेषरावजी (आप्पा) शिंदे यांनी आपेगाव परिसरात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचा तोच वारसा पुढे चालवत दरवर्षी एका आदर्श शिक्षकाला आणि एका प्रयोगशील शेतकऱ्याला गौरविण्यात येतं. त्यामुळे गावातील तरुण शिक्षकांना आणि शेतकऱ्यांना नवी प्रेरणा मिळते. यंदाचं 15 वं वर्ष असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रा. एन. के. हजारे यांच्यासह कै. शेषरावजी शिंदे समृद्धी समारोह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आदर्श शिक्षक व प्रयोगशील शेतकरी यांचा होणार गौरव

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळा येथील मुख्याध्यापक दिलीप ज्ञानोबा तट यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने तर शेतीत नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल मु. कोपरा ता. अंबाजोगाई जि. बीड येथील प्रयोगशील शेतकरी विष्णू भाऊसाहेब भारती यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट शिक्षक सन्मानाने शिंदे यांचा होणार सन्मान

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व ज्ञानदानाप्रती समर्पणभावना याबद्दल श्रीनिवासा नागरी सहकारी पतसंस्था, अंबाजोगाई यांच्या सौजन्याने प्रा. जयजित (बापू) शेषराव शिंदे यांना उत्कृष्ट शिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आपेगावचे सचिव जयजित (बापू) शिंदे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्रादेशिक पशुधन नियंत्रण अधिकारी देवीदास प्रल्हाद कोपरेकर (वाघमारे) हे उपस्थित राहणार आहेत. समारोहासाठी आपेगाव व परिसरातील नागरिक, शिक्षक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...