अंबाजोगाई : अंबाजोगाईत गेल्या ४२ वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृति समारोहाचे उद्घाटन पुणे येथील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ.अतुल पेठे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी यशवंतरावांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना राबवली. साहित्य, संस्कृती, नाटकं, शेती अशा सर्व घटकांना त्यांनी न्याय दिला. मुख्यमंत्री ते उपपंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. या प्रवासात संस्था या देशासाठी पायाभूत असतात, हा विचार त्यांनी मांडला. अशी दूरदृष्टी, भविष्याचा वेध घेणारा सुसंस्कृत नेता पुन्हा झाला नाही. महाराष्ट्राची आब त्यांनी राखली, असे डॉ.पेठे म्हणाले. दीपप्रज्वलन, यशवंतराव चव्हाण व कै. भगवानराव लोमटे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून समारोहाचे उद्घाटन झाले. स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व आभार सतीश लोमटे यांनी मानले. परिचय अमृत महाजन यांनी करून दिला. संचलन प्रा. मेघराज पवळे यांनी केले. व्यासपीठावर समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.

संस्कृतीतून समाजाचे स्वास्थ्य

संगीत, कला, साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून समाजाचे स्वास्थ्य वेगवेगळ्या अंगाने सुस्थितीत राहते, ही शिकवण यशवंतरावांनी समाजासमोर ठेवली. असा भविष्याकडे दीर्घ पल्ल्याची दृष्टी असणारा नेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत त्यांनी यशवंतरावांना आदरांजली व्यक्त केली.

आज समाज तोडण्याचे काम सुरू आहे

आज राष्ट्रात समाज तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाने समाजातील शांतता व सलोखा दुरावला जात आहे. भाषावाद, प्रांतवाद, भेदाभेद आणि द्वेष यांच्या नावावर समाजाचे विघटन केले जात आहे. धर्माधर्मात फारकत केली जात आहे. द्वेषावर आधारित समाजरचना निर्माण होत असल्याने संस्कृती व सामाजिक काम दुरावत चालले आहे. अशा स्थितीत यशवंतरावांचे विचार समाजासाठी दिशादर्शक ठरतात, असे डॉ.पेठे म्हणाले. समाजातील संवाद दिवसेंदिवस दुरावत चालल्याचे सांगून समाजाप्रती संवेदना जागृत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

४२ वर्षांचा वारसा

अंबाजोगाईत गेल्या ४२ वर्षांपासून यशवंतरावांच्या विचाराचा वारसा अंबाजोगाईकर जोपासतात, याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कविता कराड गित्ते यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल समारोह समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...