अंबाजोगाई : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने सोमवारी (दि. 28) मानवलोक अंबाजोगाई येथे महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र हे महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम पारित करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक भाषणात तालुका कृषी अधिकारी रवी मुंडे यांनी अधिनियमाचे महत्त्व आणि सेवा संकल्प अभियानावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी ओमप्रकाश कांगणे यांनी महिला शेतकरी म्हणजे काय, अधिनियमानुसार शेतीची व्याख्या यावर सखोल माहिती दिली. 18 वर्षे पूर्ण झालेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या आणि शेतीशी निगडित कोणतेही काम करणाऱ्या भूमिहीन महिला शेतमजूर, एकल महिला, विधवा व परितक्त्या महिलांना कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामसभेमार्फत महिला शेतकरी म्हणून सन्मान व प्रमाणपत्र देण्यासाठीचे निकष त्यांनी समजावून सांगितले. प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया, गाव पातळीवर कृषी विभागाची जबाबदारी आणि प्रमाणपत्रानंतर मिळणारे विविध लाभ, विशेषतः गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना यावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा झाली. श्रीमती सुवर्णा आरसुळे यांनी गटचर्चा आणि सादरीकरणाच्या माध्यमातून अधिनियमाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पाणी फाउंडेशनचे शिनगारे, उप कृषी अधिकारी बी. एस. सूर्यवंशी यांच्यासह उमेदच्या असंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बी. एस. सूर्यवंशी यांनी केले. संपूर्ण प्रशिक्षण उत्साही वातावरणात पार पडले.