गौतम बचुटे/केज:- केज-कळंब रोडवरील साळेगाव येथून शेलगाव गांजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर मोटार सायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर महादेव उबाळे (वय २२) असे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उत्तरेश्वर महादेव उबाळे हे आपल्या मोटार सायकलवरून (क्र. एम एच १४ / डी डी ८३९०) केजहून साळेगाव, शेलगाव गांजी मार्गे युसुफवडगावकडे जात होते. दरम्यान, साळेगाव (गांजी फाटा) ते शेलगाव गांजी रस्त्यावरील एका वळणावर त्यांची मोटार सायकल अचानक घसरली. या अपघातात ते रस्त्याच्या कडेला खड्ड्यात फेकले गेले आणि डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झालेले ठिकाण अडवळणाचे आणि निर्मनुष्य असल्याने, तसेच रात्रीच्या वेळी अंधार असल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळे त्यांचा मृतदेह रात्रभर त्या निर्जन स्थळी अंधारात पडून राहिला. दुसऱ्या दिवशी, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास शेतात जाणाऱ्या नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तातडीने केज पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल महावीर सोनवणे व बाबजी दराडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. या प्रकरणी पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

You must be logged in to post a comment.