अंबाजोगाई (प्रतिनिधी):
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने धडपडणाऱ्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योगदान देणाऱ्या आणि निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा येल्डा (के. बेसिक, ता. अंबाजोगाई) येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मीराताई मोहनराव गिराम यांना माजी मुख्याध्यापक स्व. विठ्ठलराव वरोडे गुरुजी स्मृती ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान करून नुकताच गौरविण्यात आले.

आनंद तरंग शिक्षक मंच, अंबाजोगाई यांच्या वतीने महात्मा गांधी जयंतीच्या पवित्र दिनी हा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पहार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मुख्याध्यापक रामराव मुंडे, सी. बी. देशपांडे, डि. एस. तट, निवृत्ती दराडे , सदानंद वालेकर, श्रीधर देशपांडे, रत्नाकर निकम तसेच सौ. सुमेधाताई मुंडे, सौ. मंजुषाताई महाजन, सौ. सुवर्णा निकम आणि सौ. मंजुषाताई देशपांडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मंजुषाताई महाजन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सदानंद वालेकर यांनी मानले. श्रीमती मीराताई गिराम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कार्याची घेतली दखल

श्रीमती मीराताई गिराम यांनी आजवर विविध ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. वर्गात विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना मायेने व आपुलकीने मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांनी स्वतः विविध प्रकारची उच्चस्तरीय प्रशिक्षणे पूर्ण करून तालुका स्तरावर इतर शिक्षकांनाही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मोलाचे प्रशिक्षण दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वतः स्वीकारून ती पूर्ण करण्यासाठी विविध शैक्षणिक क्लुप्त्यांचा वापर करत त्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचे प्रामाणिक कार्य त्या सातत्याने करत असतात. अशा कृतिशील, अभ्यासू, विद्यार्थीप्रिय आणि उत्तम संघटन कौशल्य असलेल्या शिक्षिका म्हणून त्यांचा हा गौरव करण्यात आला.