गौतम बचुटे, केज:- “तुझ्या गळ्यात असलेली मफलर माझी आहे” असे म्हणून दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील जानेगाव येथे घडली आहे. केवळ एका मफलरवरून झालेला हा वाद हाणामारीपर्यंत गेल्याने गावात खळबळ उडाली आहे.

दि. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुनील धर्मराज चटप हे गावातील खंडोबा मंदिरासमोर उभे असताना वसंत जनार्धन चटप हा तेथे दारू पिऊन आला.वसंत याने सुनील यांना म्हटले की, “तू माझी मफलर का घेतलीस.” त्यावर सुनील चटप यांनी सांगितले की, “तुझी मफलर मी घेतली नाही. गळ्यातील मफलर ही माझीच आहे. वाटल्यास तुला मी नवीन मफलर घेण्यासाठी पैसे देतो.”

इतके साधे बोलणेही वसंत याला सहन झाले नाही. “तू लय पैसेवाला झालास का? मला मफलर घेण्यासाठी पैसे देतोस?” असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर चापटबुक्क्यांनी मारहाण करीत त्याने जवळच पडलेला दगड उचलून सुनील चटप यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत सुनील चटप यांचे डोके फुटून ते जखमी झाले.जखमी अवस्थेतच सुनील चटप यांनी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वसंत चटप याच्या विरुद्ध गु. र. नं. 308/2026, भा. न्या. सं. 115(2), 118(1), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे हे करीत आहेत.दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून डोक्यात दगड मारण्याच्या या घटनेमुळे जानेगावात संताप व्यक्त होत आहे

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...