आकाश वाघमारे / चंदन सावरगाव : केज-अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव येथे निसर्ग हॉटेल जवळ सिमेंट रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील मधोमध गज उघडे पडले असून ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या जीवाशी खेळ होत आहे.
या रस्त्यावरून रोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने तसेच एसटी बसेस ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी तर हा रस्ता आणखीनच धोकादायक ठरत आहे.
सिमेंट रस्त्याला चिरा, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
नव्यानेच झालेल्या या सिमेंट रस्त्याला एवढ्या लवकर भेगा कशा पडल्या, असा सवाल वाहनचालक आणि ग्रामस्थ विचारत आहेत. रस्त्याच्या सांध्यातील गज उघडे पडल्याने सिमेंटचे तुकडे बाहेर आले आहेत. फोटोत दिसत असल्याप्रमाणे रस्ता जागोजागी उखडला असून खडी बाहेर आली आहे. यावरून रस्त्याचे काम करताना दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेला रस्ता जर काही महिन्यातच असा तुटत असेल तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
अपघाताची वाट पाहणार का? तातडीने दुरुस्तीची मागणी
हा रस्ता केज ते अंबाजोगाई या महत्त्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शाळकरी मुले, नोकरदार, शेतकरी, रुग्णवाहिका यांची नेहमीच वर्दळ असते. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून भेगा बुजवाव्यात आणि उघडे पडलेले गज दुरुस्त करावेत, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी धोक्याची सूचना फलक लावण्याची गरज आहे.
