अंबाजोगाई: अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळवटी धरण तलावातील पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिला असून, पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अर्ध्या अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्यावर आणि परिसरातील शेतीवर होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी सध्या धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. काळवटी धरण हे अंबाजोगाई शहराच्या जवळपास ५० टक्के भागाला पाणीपुरवठा करते. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही वाढली आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीसाठा कमी झाल्याने नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.सध्या आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू असला तरी, आहे त्या साठ्यावर जेमतेम काही काळच पाणीपुरवठा सुरू राहू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास आगामी काळात टँकरवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.याचबरोबर अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठ्याची स्थितीही समाधानकारक नसल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही प्रमुख जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. आता रब्बी हंगामासाठी शेतकरी पूर्णपणे काळवटी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने रब्बीच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी पिके जगवण्यासाठी पाण्याची चिंता त्यांना सतावत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज

या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नियोजन करावे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती करावी आणि पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काही महिन्यांतच शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...