तानाजी माटे/लातूर:- लातूर शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. शहरातील ताजोद्दीन बाबा दर्गा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 13 लाख 8 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा व तंबाखूजन्य साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. संशयित वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित जर्द्याचे पोते आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी मुद्देमालासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा कंपनीचे ACE Gold हे चारचाकी वाहन देखील ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 13 लाख 8 हजार रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाई दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील दोन संशयित आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. अंधारामुळे पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश आले. सध्या या दोन्ही फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून, त्यांच्या मागावर पोलीस आहेत.या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष मोहीम हाती
महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाला यांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे. असे असतानाही चोरट्या मार्गाने या पदार्थांची तस्करी सुरूच आहे. नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या या पदार्थांच्या विरोधात लातूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
