माजलगाव दि. १८: माजलगाव-तेलगाव रोडवरील हॉटेल शिवराज जवळ आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पाथरूड (तेलगाव-माजलगाव मार्ग) येथे एसटी बस क्रमांक MH-२०-२७४० आणि हुंडाई कार क्रमांक MH-२६ AK ४२१० यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून कार एसटी बसच्या खाली घुसली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मयत माजलगावचे असल्याची माहिती मयत प्रवासी हे माजलगाव शहर व तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताचे नेमके कारण आणि मृतांची नावे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेली नाहीत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
