अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव ते सुगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगाव येथील रहिवासी अजय भारत शिंदे (वय 31) हे दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या MH 44 E 3863 क्रमांकाच्या स्कूटीवरून जात होते. सुगाव फाट्याजवळ स्कूटीचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.20 वाजता त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मृताचे बंधू अविनाश भारत शिंदे (वय 37, रा. सुगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम हे करत आहेत.
