
अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यातील देवळा रोड वाघाळा येथे ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. १५) सकाळी घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा रोडवरील वाघाळा फाट्याजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर देवळा रोडने जात असताना समोरून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने अचानक कट मारला. यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून रस्त्याच्या कडेला पलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून ऊस रस्त्यावर विखुरला गेला.
दरम्यान, या मार्गावर सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोठी वर्दळ आहे. रस्ता अरुंद असल्याने आणि काही ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अज्ञात वाहनाच्या चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
नागरिकांची मदत
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदत केली. ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून अज्ञात वाहनांच्या बेदरकारपणामुळे अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
