विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ :
वंचित बहुजन आघाडी – बीड जिल्हा (पूर्व) च्या वतीने आगामी काळात होऊ घातलेल्या संविधान सन्मान सभेच्या पूर्वतयारी संदर्भात तसेच पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आज सोमवारी (दि. १६) सकाळी ठीक ११:३० वाजता परळी येथील चेमरी रेस्ट हाऊस, इटके कॉर्नर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाचे महत्व जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर संविधान सन्मान सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार असून त्याच्या नियोजनासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे बीड पूर्व जिल्हा अध्यक्ष प्रकाश उजगरे हे अध्यक्षस्थान भूषवणार असून त्यांच्यासोबत जिल्हा महासचिव प्रशांत उघडे, जिल्हा महासचिव विकास पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रसनजीत रोडे यांच्यासह जिल्हा कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या विषयावर चर्चा

या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा, बूथ कमिटी बांधणी आणि संविधान सन्मान सभेची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगामी संविधान सन्मान सभेसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी वाटप, प्रचार प्रसाराचे नियोजन आणि जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होईल.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...