गौतम बचुटे/केज: केज जवळ असलेल्या बरड फाटा येथील रेणुका कला केंद्रावर एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने डांबून, नजर कैदेत ठेवून तिला ग्राहकांसमोर नाचायला लावून अनैतिक धंद्यासाठी बळजबरी केल्याप्रकरणी पार्टी मालकिणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून कला केंद्राचे मालक फरार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी ता. ब्रम्हपुरी येथील १२ वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रगती चाहंदे (रा. चांदली ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) हिने लातूर येथे नोकरीचे अमिष दाखवून, ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिचे बनावट आधार कार्ड बनवून संगीत पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण (रा. चापडोहा, ता. जि. यवतमाळ) हिच्याकडे सोपवले. तेथे तिला बळजबरीने नाचकाम करायला लावले, येणाऱ्या ग्राहकांनी अश्लील चाळे केले आणि पार्टी मालकीण अंजली हिने तिला ग्राहकांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. नकार देताच तिला एका खोलीत डांबून नजर कैदेत ठेवून स्वयंपाक व धुणी-भांडी करायला लावून छळ केला.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अंजली भारत चव्हाण, रेणुका कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे (रा. सारुळ ता. केज) आणि त्याचा साथीदार सुजित शिनगारे (रा. अंबाजोगाई जि. बीड) या तिघांविरुद्ध गु. र. नं. ७१५/२०२६ भा. न्या. सं. ७५, ७९, १४३(४), १४६, ३३७, ४४० सह पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयीन कोठडी
अटक केलेल्या संगीत पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण हिला अंबाजोगाई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दोघे फरार, पीडिता बालसुधार गृहात
गुन्हा दाखल असलेले रेणुका कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे आणि साथीदार सुजित शिनगारे हे दोघे फरार असून पोलीस शोध घेत आहेत, तर पीडित अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
