गौतम बचुटे/केज:
सांगली येथील साखर कारखाना परिसरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुंडेवाडी येथील ऊसतोड मजूर बाबासाहेब तोगे यांना मारहाण करून त्यांची मोटारसायकल व मोबाईल पळवून नेल्याची तक्रार मयताच्या मुलाने दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील ५५ वर्षीय बाबासाहेब गोपीनाथ तोगे हे सांगली जिल्ह्यात ऊसतोडीसाठी गेले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करत मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणला होता.
तक्रारीनुसार, दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील शेतात अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार व राधाबाई आशोक केदार (सर्व रा. सांगवी ता. केज) यांनी ऊसतोडणीच्या ५० हजार रुपये उचल परत देत नाही व कामाला येत नाही या कारणावरून हुज्जत घालून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी मुलगा सचिन तोगे याने भांडण सोडवले असता आरोपींनी उचलीचे कारण सांगून त्यांची टीव्हीएस रायडर मोटारसायकल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दि. १३ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब तोगे यांचा सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूस अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार व राधाबाई आशोक केदार या तिघांनी केलेली मारहाणच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
दि. १४ नोव्हेंबर रोजी मयताचा मुलगा सचिन बाबासाहेब तोगे यांच्या तक्रारीवरून अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार व राधाबाई आशोक केदार या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७१४/२०२६, भा. न्या. सं. ११५(२), ११९(१), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून सांगली येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवून तो प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता
सांगली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद असून व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यास आरोपींविरुद्ध अधिक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
या प्रकरणातील आरोपींविरुद्ध यापूर्वीही केज पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये नितीन केदार यांना गंभीर मारहाण केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
