गौतम बचुटे/केज: पोलिसांची वर्दी म्हटली की दरारा, जरब आणि भीती… पण याच वर्दीच्या आतही एक हळवं, आईच्या मायेने भरलेलं काळीज धडधडत असतं, हे केजमध्ये पाहायला मिळालं!

केज पोलिस ठाण्याच्या आवारात काल काळजाला पाझर फोडणारा प्रसंग घडला. धाराशिवच्या एका गरीब वृद्धेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले होते. ते मंगळसूत्र परत मिळाल्याच्या आनंदात ती 60 वर्षीय सोजरबाई कांबळे थेट पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पाया पडायला गेली.
पायाला हात लागताच PI सूर्यतळ हादरले! त्यांनी तिला खाली झुकूच दिलं नाही. दोन्ही हातांनी घट्ट धरून उठवलं, आईसारखं छातीशी कवटाळलं आणि तिथे उभ्या असलेल्या शेकडो लोकांसमोर काळजाला हात घालणारे शब्द उच्चारले “आई, मी तुमच्या मुलाच्या वयाचा! तुम्ही माझ्या पाया नका पडू. चला माझ्या घरी, माझी आई तुमच्या वयाचीच आहे, मी तुमची भेट घालून देतो!” एवढं बोलून त्या माय-लेकीला ते स्वतःच्या घरी घेऊन गेले. आपल्या कुटुंबासोबत बसवून चहा-पाणी केलं. हा प्रसंग पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.
सीसीटीव्ही ठरली महत्त्वाचा पुरावा
6 नोव्हेंबरला केज बस स्टँडवर ही घटना घडली होती. गुन्हा दाखल होताच सूर्यतळ यांनी स्वतः सीसीटीव्हीचे जाळे पिंजून एका सराईत चोरट्याला उचलून आणलं. आधी नाटकं करणारा चोरटा पोलिसी हिसका बसताच तोंडावर आपटला आणि चार तोळ्याचे मंगळसूत्र चोरले.
एकीकडे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आणि दुसरीकडे आईसाठी मायेचा पाझर – असा कर्तव्य आणि प्रेमाचा संगम म्हणजे PI राहुल सूर्यतळ अशी चर्चा आज पूर्ण बीड जिल्ह्यात रंगली आहे.
महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू
अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सोजरबाई कांबळे यांचे चार तोळ्याचे मंगळसूत्र परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पोलिसांविषयीची भीती जाऊन आदराची भावना निर्माण झाली.

