गौतम बचुटे, केज :- म्हैसूरचे शूर शासक टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त केज तालुक्यातील साळेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले.

दि. २० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान जयंती उत्सव समितीच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष शोएब सय्यद आणि उपाध्यक्ष एजाज शेख यांनी या शिबिरासाठी विशेष पुढाकार घेतला. जयंती केवळ साजरी न करता, ती समाजोपयोगी उपक्रमातून साजरी करावी, या उद्देशाने रक्तदान शिबिराचा संकल्प करण्यात आला.

या शिबिरामध्ये बीड येथील माजी सैनिक रक्तपेढीच्या पथकाने रक्त संकलन केले. डॉ. राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिनी कर्वे, अखिल सय्यद, कपिल कांबळे, ऋषी सातपुते यांनी रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन केले. रक्तदान करण्यापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची रक्तदाब, वजन आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.साळेगावसह परिसरातील अनेक गावांतील युवकांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तुमच्या एका बाटली रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात,” असा संदेश यावेळी देण्यात आला. अनेकांनी पहिल्यांदाच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिर यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

विचारांचा आदर्श घ्या

टिपू सुलतान हे शौर्य, स्वाभिमान आणि देशप्रेमाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन युवकांनी समाजसेवेत पुढे यावे, असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले. रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना, अपघातग्रस्तांना आणि शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...