गौतम बचुटे/केज:
एसटीच्या बॉनेटवर बसण्यास विरोध केला म्हणून एका व्यक्तीने कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाचीच गच्ची धरून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार केज शहरात घडला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्यक्ती खराच एसटी कर्मचारी आहे की बनावट ओळखपत्र दाखवून दादागिरी करीत होता, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास शेगाव आगाराची शेगाव – पंढरपूर ही एसटी बस (क्र. MH १४ / BT ३००१) केजहून पंढरपूरकडे जात होती. चालक शिवाजी गोवर्धन राठोड हे बस चालवीत होते. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला. तो प्रवासी सीटवर न बसता थेट बसच्या इंजिनच्या बॉनेटवर जाऊन बसला. बॉनेटवर बसणे हे नियमाविरुद्ध असून अपघाताला निमंत्रण देणारे आहे.
बस सुमारे २०० मीटर पुढे गेल्यानंतर चालक राठोड यांनी त्याला “व्यवस्थित बसा” असे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने आपण एसटी महामंडळाचा कर्मचारी असल्याचे सांगून आपले ओळखपत्र दाखवले. त्या ओळखपत्रावर ‘जाधवर’ असे नाव होते.
तू केज सोडून दाखव…
ओळखपत्र दाखवल्यानंतरही त्या व्यक्तीचा राग शांत झाला नाही. त्याने चालक राठोड यांच्या गच्चीला धरून धक्काबुक्की केली. “तू केज सोडून दाखव, मी पन्नास तरुण जमा करून तुला जीवे मारून टाकीन, तरी पत्ता लागणार नाही,” अशी धमकी देत त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यामुळे चालकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी चालक शिवाजी राठोड यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात कथित कर्मचारी जाधवर याच्याविरुद्ध गु.र.नं. ७२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), १३२, ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने पुढील तपास करीत आहेत.
तो जाधवर ओरिजनल की डुप्लिकेट?
याबाबत कळंब आगाराचे आगार व्यवस्थापक घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, “जाधवर या नावाचे आमच्याकडे अनेक कर्मचारी आहेत. त्यापैकी नेमका कोण, हे निश्चित सांगता येणार नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तो व्यक्ती खराच एसटी कर्मचारी होता, की बनावट ओळखपत्राचा वापर करून दादागिरी करीत होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. खरा कर्मचारी असेल तर महामंडळाने त्याच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
