अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा: खरीप संपून महिने उलटले, रब्बी हंगाम अर्ध्यावर आला आहे. अशा वेळी कृषी विभाग शेतकऱ्यांना खरीपाच्या ई-पीक नोंदणीचा मेसेज पाठवत आहे. तोही एक-दोन वेळा नाही, तर अवघ्या दीड मिनिटात तब्बल 72 वेळा!
देवळा येथील शेतकरी रवींद्र भानुदास देवरवाडे यांना गुरुवारी दुपारी हा विचित्र अनुभव आला. त्यांचा मोबाईल सतत वाजू लागला. AX-KISAAN-S कडून एकच मेसेज पुन्हा पुन्हा येत होता. हा फक्त देवळाचाच प्रश्न नाही. बीड जिल्ह्यात अनेक गावांत असेच उशिरा आणि वारंवार मेसेज येत असल्याच्या तक्रारी आहेत.
” देवळा येथील सर्व्हे क्रमांक 64 साठी आपले शेत सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्व्हेक्षकाने आपल्या क्षेत्रावर सोयाबीन पीक नोंदविले आहे. आपण या तपशीलाशी समाधानी नसल्यास, 72 तासांच्या आत लिंकवर तक्रार नोंदवा.”
वेळ चुकली, पद्धत चुकली
खरीपातील सोयाबीन कापून, विकूनही झालं. आता शेतात रब्बीचा गहू, हरभरा उभा आहे. आता खरीपाची नोंदणी करून काय फायदा? जेव्हा नोंदणी हवी होती, तेव्हा यंत्रणा झोपली होती का, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.एक मेसेज समजू शकतो, पण दीड मिनिटात 72 वेळा मेसेज म्हणजे मोबाईल हँग होण्याची वेळ. शेतात काम सोडून मोबाईल बघावा लागला.
ई-पीक नोंदणी का महत्वाची?
हीच नोंदणी सातबाऱ्यावर जाते. यावरूनच पीकविमा, नुकसान भरपाई ठरते. नोंदणी चुकीची झाली तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. म्हणून वेळेवर मेसेज येणे गरजेचे आहे.
“रब्बी अर्धा झाला, आता खरीपाचा मेसेज 72 वेळा येतोय. हा कृषी विभागाचा अजब कारभार आहे, शेतकऱ्याची चेष्टा आहे.” – रवींद्र देवरवाडे, शेतकरी, देवळा
Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...
More by Beed News Express