अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील धावडी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रात्रीचे 10 वाजले तरी गावातील रस्त्यावर हंडे, कळशा आणि प्लास्टिकच्या टाक्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथे मागील पंधरा दिवसापासून भिषण पाणी टंचाईचे संकट उभारले आहे. गावाच्या आजूबाजूचे तलाव आठले असून विहीरी कोरड्या पडल्या आहेत. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंच घुले यांनी एक टँकर सुरु केले आहे. पाण्याचा टँकर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना रात्रभर रांगेतच जागून बसावे लागणार आहे. आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी अनेक महिलांनी हंडे-कळशांवर चादरी व गोधड्या टाकून ठेवल्या आहेत.
गावाशेजारील तलाव आटला असून विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कोणतीही खात्रीशीर व्यवस्था गावात राहिलेली नाही. दिवसभर घरकाम सांभाळल्यानंतर रात्री पाण्यासाठी रस्त्यावर ताटकळत बसावे लागत असल्याने महिलांची मोठी फरपट होत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने टँकरच्या सुरु करावे आणि धावडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तलावातून पाणी आनण्यास विरोध
भावठाना येथील तलावातून पाणी आणण्यासाठी सरपंच काशिनाथ घुले यांच्यासह गावकरी प्रयत्न करत आहेत. परंतु प्रशासनाकडून यास विरोध होत आहे. त्यामुळे गावकरी संतापले असून प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
