गुरुजनांचा सन्मान; भाऊबीजेच्या भेटीतून मैत्रीच्या नात्याला उजाळा

अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील जय किसान विद्यालयात एसएससी १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव जयजित बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संस्थेच्या सहसचिव शिंदे वहिनी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागेश सर, रोकडे सर, गोरे सर, नांदुरे सर, पाखरे सर, गोविंद उपाध्याय सर, घाडगे सर, ढगे सर, घाटुळ सर, चव्हाण सर, साळुंखे सर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. धनंजय काळे सर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या जुन्या आठवणी, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि वर्गातील गमतीदार प्रसंगांना उजाळा दिला. अंगद ठोंबरे, आशा अंबड, चंदा भिसे, बाळू भोरे, सुशील भोसले, संदीप पाटील, नरेश पवार यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. नरेश पवार यांच्या पोवाड्याने कार्यक्रमात रंगत आणली.

संदीप विठ्ठलराव पाटील यांनी वसतिगृहातील आठवणी, शेषराव आप्पांची शिस्त आणि शालेय संस्कारांचे महत्त्व सांगितले. साखरे सर यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि समाजाप्रती योगदान देण्याचा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात जयजित बापू शिंदे यांनी शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे व संदीप पाटील यांनी केले, तर बाळू भोरे यांनी आभार मानले. आयोजनासाठी आशिष रांदड, बाळू भोरे, ज्ञानेश्वर शिंदे, धनंजय काळे, संतोष थोरबोले आणि राजू लोमटे यांनी परिश्रम घेतले. भोजनानंतर गीतगायनाचा कार्यक्रम झाला. अंगद ठोंबरे, संदीप पाटील आणि उत्तम शितोळे यांनी गीते सादर केली. विशेष म्हणजे मित्रांच्या वतीने मैत्रिणींना भाऊबीजेची भेट म्हणून साड्या देण्यात आल्या.

गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि शालेय संस्कारांचे महत्त्व

अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे असलेले योगदान मनोगतातून व्यक्त केले. शाळेत मिळालेली शिस्त, संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वसतिगृहातील अनुभव यांनी जीवनाला योग्य दिशा दिल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीत शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची असते, याची जाणीव या स्नेहमेळाव्यातून पुन्हा अधोरेखित झाली. काळ बदलला, विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावले; मात्र गुरुजनांविषयीचा आदर आणि शाळेविषयीची ओढ आजही कायम असल्याचे या सोहळ्यातून दिसून आले.

भाऊबीजेच्या भेटीतून मैत्रीच्या नात्याला भावनिक उजाळा

या स्नेहमेळाव्यात मित्रांच्या वतीने मैत्रिणींना भाऊबीजेची भेट म्हणून साड्या देण्याचा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. अनेक वर्षांपासून जपलेल्या मैत्रीच्या नात्याला या उपक्रमामुळे भावनिक स्पर्श मिळाला. शालेय जीवनात एकत्र शिकलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांच्यातील आपुलकी, जिव्हाळा आणि परस्परांबद्दलची आत्मीयता कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले. रक्ताच्या नात्यापलीकडेही मैत्रीतून बहीण-भावाचे नाते निर्माण होऊ शकते, हा सुंदर संदेश या उपक्रमाने दिला. त्यामुळे हा स्नेहमेळावा केवळ भेटीगाठींपुरता मर्यादित न राहता नात्यांची वीण अधिक घट्ट करणारा ठरला.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...