गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरात पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या टोरँटो कंपनीत काम करणाऱ्या एका परराज्यातील मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नांदूरघाट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दि. 23 नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील नांदूरघाटपासून जवळच असलेल्या वाघेबाभुळगाव शिवारात ही घटना घडली. मृत मजुराचे नाव फैजान मोहम्मद, वय 23 वर्षे, रा. उत्तर प्रदेश असे आहे. तो टोरँटो या पवनचक्की कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजान मोहम्मद याने वाघेबाभुळगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळच्या सुमारास ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. यानंतर परिसरात एकच गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फैजान याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता का, कौटुंबिक कारण आहे का, की कामाच्या ठिकाणी काही वाद झाला होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. परराज्यातून रोजगारासाठी आलेला तरुण मजूर आणि त्याने उचललेले हे टोकाचे पाऊल यामुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. कंपनी व्यवस्थापनानेही याबाबत माहिती घेतली असून, पोलिसांना सहकार्य करण्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी नांदूरघाट पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे करीत आहेत. मृताच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेशात माहिती कळवण्यात आली असून, त्यांच्या जबाबानंतरच आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.
