अंबाजोगाई : मराठवाड्यात गेल्या दहा महिन्यात 750 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रात हा आकडा 950 च्या पुढे गेला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून याला फडणवीस सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याची टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत. अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा सरसकट पाच हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी माने यांनी केली.

अंबाजोगाई दौऱ्यावर आले असता माने यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ॲड. माणिक आदमाने, राहुल शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मराठवाड्याचा तब्बल 60 हजार कोटींचा विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. मात्र येथील नेतृत्व यावर बोलायला तयार नाही. प्रत्येकजण आपल्या मतदारसंघातील मतांच्या बेरजेच्या राजकारणात गुंतला आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे दुर्लक्षित राहत आहेत आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान होत आहे, असे माने म्हणाले.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागपूर येथे भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये राज्यभरातून जवळपास 50 हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या मोर्चातून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण, ओबीसींची जातनिहाय जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण, मुस्लिमांचे शैक्षणिक आरक्षण, गोवारी समाजाला स्वतंत्र आरक्षण, आदिवासींचे हक्क, वनहक्क कायदा तसेच एस.सी., एस.टी. बजेट कायदा या मागण्या करण्यात येणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आणि विदर्भ, मराठवाडा व कोकणचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणीही या मोर्चातून करण्यात येणार आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...