परळी .jpeg

विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ : भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पाणी, प्रकाश आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दलित समाजाची प्रमुख स्मशानभूमी असलेल्या या ठिकाणाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शांतीवन स्मशानभूमी बचाव कृती समितीने केला आहे.स्मशानभूमीतील दोन्ही बोअर अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठीही पाणी मिळत नाही. रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नसल्याने नागरिकांना अंधारात अंत्यसंस्कार करावे लागतात. मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे दुःखाच्या प्रसंगी नातेवाईकांची आणखी गैरसोय होत आहे.

स्मशानभूमीत पाण्याचा अभाव

शांतीवन स्मशानभूमीत दोन्ही बोअर बंद आहेत, म्हणजे प्रश्न फक्त पाण्याचा नाही, तर सन्मानाचा आहे. माणूस गेल्यानंतर त्याच्या अस्थी गोळा करणं हा शेवटचा विधी असतो. त्यासाठीही नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावं लागत असेल तर नगरपरिषदेचा कारभार किती बेजबाबदार आहे, हे यावरून कळतं. जिवंतपणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि मेल्यानंतरही पाणी मिळत नाही, ही भावना लोकांच्या मनात का आली, याचं उत्तर प्रशासनाने द्यायला पाहिजे. बोअर दुरुस्त करणं हे काही मोठं काम नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. पण महिने झाले तरी ते होत नाही, याचा अर्थ या स्मशानभूमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का, असा प्रश्न लोकांना पडतोय.

रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार

रात्री मृतदेह घेऊन स्मशानभूमीत जाणं हीच मुळात दुःखद गोष्ट आहे. त्यात तिथे प्रकाशच नसेल तर काय अवस्था होईल. ठेचकाळून पडणं, साप-विंचू चावणं, हे धोके सामान्य नाहीत. सोलर दिवे बसवूनही ते बंद पडलेत आणि हायमास्ट लाईटचा अजून पत्ता नाही. याचा अर्थ सुविधा एकदा बसवून सोडून दिल्या जातात, त्यांची देखभालच केली जात नाही. तुटलेलं प्रवेशद्वार आणि अस्वच्छता हेही त्याचच लक्षण आहे. म्हणून हा प्रश्न फक्त लाईटचा नाही, तर देखभालीच्या संपूर्ण यंत्रणेचा आहे. जोपर्यंत रोजची स्वच्छता आणि देखभाल होत नाही, तोपर्यंत फक्त नवीन लाईट लावून प्रश्न सुटणार नाही.

समितीच्या मागण्या

दोन्ही बोअर तातडीने सुरू करावेत, कायमस्वरूपी पाण्याची टाकी बसवावी, हायमास्ट लाईट व सोलर दिवे दुरुस्त करावेत, दररोज स्वच्छता करावी, तुटलेले प्रवेशद्वार दुरुस्त करावे.आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे अमर सोपान रोडे यांनी दिला आहे.

“जिवंत माणसाला वेळेवर पाणी नाही, मेल्यानंतर अस्थी विसर्जनासाठीही पाणी नाही! ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. स्मशानभूमी ही केवळ अंत्यसंस्काराची जागा नसून, दुःखाच्या प्रसंगी नागरिकांना सन्मानाने अंतिम विधी करता यावेत, अशी मूलभूत सुविधा आहे. नगरपरिषदेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.” -अमर रोडे

 - अमर रोडे

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...