गौतम बचुटे/केज : अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिघोळआंबा शिवारात, कानडी बदनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना तलावाजवळ जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील इतर नागरिकांना आणि पोलिसांना दिली. घटनेची माहिती गावात पसरताच परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
प्राथमिक माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आलेला असून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला असून मृत व्यक्तीची ओळख पटणे कठीण झाले आहे. हा खून नेमका कधी आणि कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या अनोळखी व्यक्तीची कोणाला माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी युसुफवडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
